Ashadhi Ekadashi : जिल्हाभरात रंगला विठुरायाच्या नावाचा गजर file photo
हिंगोली

Ashadhi Ekadashi : जिल्हाभरात रंगला विठुरायाच्या नावाचा गजर

आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम, विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात भक्तांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

On the occasion of Ashadhi Ekadashi, devotees throng Vitthal-Rukhmini temple for darshan

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त शहरासह जिल्हाभरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती. शाळा, महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंड्या काढून विठ्ठलाचे नामस्मरण करण्यात आले.

देवडा नगरातील मंदिरात गर्दी

हिंगोली : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील देवहा नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. भक्तीमय वातावरणात विठू माऊलीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुडून गेला होता. रेणुका नवदुर्गा मंडळ आणि विठ्ठल रुक्माई मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिरात येणाऱ्या माविकांसाठी फराळ आणि चहा पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, सामाजिक बांधिलकी जपत या परिसरात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पोदार शाळेत आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम हिंगोली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोतचा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या अर्चना देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शाळेच्या परिपाठामध्ये शिक्षकांनी यांनी आषाढी एकादशीचे महत्व विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले. यावेळी प्राचार्या अर्चना देशपांडे आपल्या भाषणात म्हणाल्या की, आषाढी एकादशी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे.

पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून, ती भक्ती, समता, एकता, शिस्त आणि बंधुभावाचा संदेश देणारी महान परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांनी समाजाला सत्य, प्रेम, मानवता आणि सदाचाराचा मार्ग दाखविला. या कार्यक्रमात शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विठ्ठल, रूक्मिणी आणि वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान करून सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्या दिल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिमय वातावरणामुळे शाळेचा परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दमदमून गेला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शालेय विद्यार्थ्यांच्या दिंडीने वेधले लक्ष हिंगोली: आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर शनिवारी शहरातील विविध शाळांच्या वतीने दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये लहान-लहान विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली व विविध संतांच्या मनमोहक वेशभूषा साकारल्या होत्या. बालवारक-यांचे हे नयनरम्य देखावे आणि विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विद्युलाच्या जयघोषाने संपूर्ण हिंगोली शहर विठ्ठलमय झाले होते. डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी आणि हातात टाळ-मृदंग घेऊन तल्लीन झालेले बालवारकरी शहराचे मुख्य आकर्षण ठरले होते. विठ्ठलाच्या जयजयकाराने नागरिकही या भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.

विठुनामाच्या गजरात गिरगाव नगरी दुमदुमली गिरगांव ज्ञानोबा-तुकाराम, 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने शनिवारी संपूर्ण गिरगांव नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. आषाढी एकादशीचे औचित्य साधून गिरगांवातील बेगाजी पाटील विद्यालयाच्या वतीने दिडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रांगणातून मोठ्या उत्साहात या दिंडीचा शुभारंभ झाला.

या दिंडी सोहळ्यात शाळेतील शेकडो विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. मुलांनी परिधान केलेले पांढरे कुडते-पायजमा, डोक्यावर वारकरी टोपी, हातात टाळ व भगव्या पताका तर विद्यार्थिनींनी परिधान केलेल्या नऊवारी साडचा आणि डोक्यावर तुळशीवृंदावन यामुळे संपूर्ण परिसर पंढरपूरमय झाला होता.

काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत जनाबाई यांच्या हुबेहूब साकारलेल्या रूपांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पालखीचे पूजन आणि आरती करून दिंडीचा प्रवास सुरू झाला. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी फेर धरत फुगड्या खेळल्या आणि सुंदर भारुहे व अभंग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT