हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या आशयाचे पत्र खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सोशल माध्यमावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या पत्राबाबत खासदार नागेश पाटील यांनी खुलासा करत ते पत्र आपण दिलेच नाही. विरोधकांची खेळी असल्याचे सांगत घुमजाव केले. परंतू, त्या पत्रावरून मात्र खासदार नागेश पाटील आष्टीकर चांगलचे कात्रीत सापडल्याचे दिसून आले.
एकीकडे आदिवासी समाजाचा रोष ओढवल्या गेला तर दुसरीकडे धनगर समाजाच्या रोषालाही खा. नागेश पाटील यांना सामोरे जावे लागले. राज्यात धनगर समाजाला अनुसुचीत जमातीमधून आरक्षण देऊन प्रमाणपत्र द्यावी अशी मागणी समाज बांधवांकडून केली जात आहे. त्यासाठी मागील अनेक वर्षापासून धनगर समाज बांधवांकडून लढा दिला जात असून वेळोवेळी आंदोलन, मोर्चा, निवेदन देऊन मागणी मान्य करण्याबाबत पाठपुरावा केला जात आहे.
या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी पंढरपूर, लातुर, नेवासा येथे उपोषण सुरु केले आहे या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. दरम्यान, या मागणीबाबत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी २४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्याकडे पत्र पाठविले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात धनगर समाज पिढ्यान पिढ्या मेंढपाळ चा व्यवसाय करीत असून ते पशुपालक आहेत.
१९५६ च्या एससी, एसटी यादीत राज्यातील अनु. जमातीच्या यादीत अनु.क्र.३६ वर घनगड आल्याने धनगर समाज त्यांच्या संवैधानिक हक्कापासून वंचित असून गेली ६८ वर्ष बंचित आहेत. वास्ताविक धनगड नावाचा समाज देशात काय जगात कुठेच अस्तित्वात नाही असे या पत्रात नमुद केले आहे.
खासदार आष्टीकर यांचे पत्र समाजमाध्यमातून व्हायरल झाल्यानंतर आदिवासी समाज बांधवांनी आक्रमक भुमीका घेऊन त्यांच्या या पत्राचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर खासदार पाटील यांनी या पत्राबाबत कानवर हात ठेवले आहे. आपण त्या दिवशी दिवसभर आदिवासी प्रकल्प कार्यालयात होतो तसेच रात्री उशीरा पर्यंत माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या सोबत होतो. त्यामुळे मी कोणाला पत्र देण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हा सर्व विरोधकांचा डाव असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केला. आपण अनेकांना कामासाठी कोरे लेटरपॅड देतो त्यामुळे त्याचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट केले आहे. धनगर समाजाच्या मागण्या त्यांच्या जागी ठिक आहे. पण आपण आदिवासी बांधवांवर अन्याय होईल असे कृत्य करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.