Municipalities Face Outstanding Water Tax Arrears of ₹4 Crore
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा पाटबंधारे विभागाच्या येलदरी व सिध्देश्वर धरणातून पाणी पुरवठा योजनेसाठी देण्यात आलेल्या पाण्यापोटी तब्बल ४ कोटी १० लाख ८१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. त्यामुळे आता पाटबंधारे विभागाने हिंगोली, वसमतसह सहा पाणी योजनांचा पाणी पुरवठा खंडित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पूर्णा पाटबंधारे विभागाच्या येलदरी व सिध्देश्वर धरणातून हिंगोली, वसमत, सेनगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी दिले जाते. यामध्ये हिंगोली, सेनगाव, वसमतसाठी सिध्देश्वर धरणातून पाणी दिले जाते. त्यासाठी पाणीपट्टीचा भरणा करणे अपेक्षित आहे. मात्र मागील सहा ते सात वर्षांपासून १०० टक्के पाणीपट्टीचा भरणा केलाच नाही.
दरम्यान, पूर्णा पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी पाणीपट्टी भरणा करण्यासंदर्भात नोटीस दिल्या जातात. त्यानंतर कार्यालयाकडून पार्ट पेमेंट करून उर्वरित रकमेचा मात्र भरणा करणे टाळले जाते. त्यामुळे दरवर्षी थकीत व चालू पाणीपट्टी याचा आकडा कोट्यवधींच्या घरात गेला आहे. सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टीच्या रकमेतून प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थेचा खर्च भागवावा अशा सूचना असताना पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली होत नसल्याने व्यवस्थापनाचा खर्च कसा करावा असा प्रश्नही पाटबंधारे विभागासमोर उभा राहिला आहे.
या प्रकारानंतर पूर्णा पाटबंधारे विभागाने संबंधित विभागांना नोटीस पाठविली असून तातडीने पाणीपट्टीची रक्कम भरावी अन्यथा पाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांतच पाणीपट्टीचा भरणा न केल्यास नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. हिंगोली २.७४ कोटी, वसमत १.०५ कोटी तर सेनगाव नगर पंचायतीकडे ३१.८१ लाख रुपयांची पाणीपट्टी थकली आहे.