BJP rally Hingoli CM Devendra Fadnavis
हिंगोली : हिंगोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (दि.२९) विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर, अजित पवार गटाचे आमदार राजेश नवघरे यांनी जाणे टाळले. परंतू, त्यांनी मेळाव्याच्या बाजुस असलेल्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. 2019 नंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांचा आज हिंगोलीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, वसमतचे आमदार राजेश नवघरे हे आमंत्रित होते. परंतू, या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे होते. हा भाजप पक्षाचा कार्यक्रम असल्याने व्यासपीठावर सर्व भाजप पदाधिकार्यांचीच रेलचेल होती.
विशेष म्हणजे आमदार बांगर, आमदार नवघरे यांनी हिंगोलीत हजेरी लावली. हेलिपॅडवर देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार देखील केला. परंतू, कार्यक्रमाच्या व्यासपीठावर येणे मात्र टाळले. यावरून आता जोरदार चर्चा झडत असून महायुतीच्या आमदारांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीऐवजी स्वबळावर निवडणुका लढविण्याचे संकेत मिळत असल्याने भविष्यात महायुतीतील घटक पक्षांमध्ये चांगलीच धुसफूस पाहावयास मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे जिल्ह्यातील इतर दोघा आमदारांनी पाठ फिरवली असली तरी शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण शेवटच्या टप्प्यात असताना व्यासपीठावर आगमन झाले. एकीकडे विधानसभेतील घटक पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असताना आमदार हेमंत पाटील यांनी मात्र, शेवटच्या क्षणी व्यासपीठावर येऊन राजकीय शहाणपणाचे दर्शन घडविले.