Married woman harassed for not bearing children
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तसेच माहेरावरून ५ लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या नऊ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील कारवाडी येथील नंदा यांचा विवाह परभणी येथील महेंद्र कांबळे यांच्या सोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. मात्र त्यांनी सासरचा छळ सहन केला. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. मात्र तुला मुलगा होत नाही या कारणावरून सासरच्या मंडळींनी सतत टोमणे मारण्यास सुरवात केली.
तसेच माहेरावरून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. मात्र माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्या पैसे आणू शकत नव्हता. त्यामुळे त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सासरचा छळ असह्य झाल्याने त्या माहेरी आल्या. त्यानंतर त्यांनी पोलिस दलाच्या महिला दक्षता समितीमध्ये अर्ज दाखल केला. दक्षता समितीने दोन्ही बाजूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यात तडजोड होऊ शकली नाही.
या प्रकरणी नंदाबाई यांच्या तक्रारीवरून महेंद्र कांबळे, संतोष कांबळे, दीपक कांबळे, वामन धुमाळ (रा. परभणी), विनोद रत्नापरखे (रा. वाशीम) यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.