maratha morcha andolan mumbai
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा मराठा आर क्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदानावर पोहो-चणार आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जिल्हाभरातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मागील दोन दिवसांपासून मुंबईकडे रवाना होत आहेत. गुरुवारी सकाळपासून शेकडो वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. गावोगावी महिलांनी मोर्चासाठी जात असलेल्या बांधवांचे औक्षण करून त्यांना रवाना केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर २९ ऑगस्ट रोजी आंदोलन सुरू होणार आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यातून दीड लाखापेक्षा अधिक समाज बांधव मिळेल त्या वाहनाने एका महिन्याच्या शिदोरीची सोय करून मुंबईकडे रवाना होत आहेत. गुरुवारपासूनच अनेक गावांमधून टेम्पो, जीप, ट्रॅक्टर यासह इतर वाहनांच्या माध्यमातून अगोदर अंतरवाली सराटीला जाऊन ते जरांगे यांच्या समवेत रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत.
तर दुसरीकडे काही समाजबांधव थेट मुंबईकडे रवाना होत आहेत. गुरुवारी सकाळपासून शेकडो वाहने मुंबईकडे रवाना झाली. सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्याने आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांची गर्दी दिसून येत होती. मुंबई येथील मोर्चासाठी मागील महिन्याभरापासून गावोगावी तयारी केली जात होती. १६ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांनी हिंगोली येथे चावडी बैठक घेऊन समाज बांधवांना मुंबईच्या मोर्चास येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला मराठा समाजाने मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
गिरगाव : मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे २९ ऑगस्टपासून आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. गिरगाव व परिसरातील शेकडो तरुण आणि मराठा बांधव बुधवारी अंतरवाली सराटीकडे एका महिन्याची रसद घेऊन रवाना झाले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला हक्काचं ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार करून मराठा बांधव सहभागी झाले आहेत. सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये कारण आम्ही संविधानिक व शांततेच्या मार्गाने आमचा हक्क आम्ही सरकारकडे मागत आहोत. जर सरकारने यावेळी काही दगाफटका केला तर तो सरकारला परवडणारा नसेल असा इशारा मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू पाटील प नवघरे यांनी मराठा समाजाच्या लढ्यासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. मुंबई येथे होणाऱ्या एकच मिशन, मराठा आरक्षण, मुंबईची वारी, आरक्षणाच्या दारी या आंदोलनास आमदार नवघरे यांनी राजूभय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील चाकण तळेगाव रोड, खराडी फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या समाज बांधवांसाठी खिचडी व पाणी बॉटलचे वाटप केले. यावेळी स्वतः आमदार नवघरे उपस्थित होते. समाजाप्रती आमदार नवघरे यांची कणव यामधून दिसून आली. आमदार नवघरेंच्या सामाजिक बांधिलकीचे मराठा बांधवांकडून कौतुक होत आहे.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा देत गावातील महिलांनी व तरुणींनी अनोख्या पद्धतीने बांधवांना आशीर्वाद दिले. मुंबईला आंदोलनासाठी रवाना होणाऱ्या मराठा बांधवांचे जिजाऊंच्या लेकींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. या औक्षण सोहळ्यात महिलांनी हातात दिवे व मेणबत्त्या घेऊन रांग लावली होती. पारंपरिक नऊवारी नेसलेल्या मातृशक्तीच्या डोळ्यांतून समाजासाठीची चिंता आणि बांधिलकी स्पष्ट जाणवत होती. औक्षणानंतर वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले होते.