Make government schemes accessible to the common man: Meghna Bordikar
कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवित आहे. या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी बुधवारी कळमनुरी व वसमत उपविभागाचा आढावा घेताना दिले.
यावेळी माजी आमदार गजानन घुगे, शशिकांत वडकुते, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे आदी उपस्थित होते. वसमत येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, महिला व बालविकास विभागामार्फत पीडित व गरजू महिला व बालकांसाठी बालसंगोपन योजना, सखी वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन १८१, राष्ट्रीय पोषण अभियान यासह अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेची सर्वसामान्य लाभ मिळण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी, आरोग्य विभागांनी क्षयरोगमुक्त अभियानांतर्गत तपासणीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे संशयित रुग्णांची तपासणीचे प्रमाण वाढवावे. त्यांना योग्य तो औषधोपचार करावा.
अवयवदान पंधरवाडा, संजीवनी अभियान, आयुष्यमान भारत योजना, डेंग्यू-मलेरिया अभियान यासारखे विविध उपक्रमांची जनजागृती करुन सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी. ड्राय डे अभियान राबवावा. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तदाब व शूगरच्या गोळ्या मोफत वितरीत केल्या जातात. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला द्यावा. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची जनजागृती करावी. तसेच अवैध गुटखा विक्रेत्यावर गुन्हे दाखल करावेत, हद्दपारीची कारवाई करावी, अशा सूचना दिल्या.
कळमनुरी उपविभागात सुरु असलेली रस्त्याची कामे दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी, दर्जाहीन कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी. ऊर्जा विभागामार्फत पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर पंप योजना, कुसूम योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेसह नवीन वीज उपकेंद्राचे प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, महिला व बालविकास अधिकारी दरपलवार, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके यांच्यासह विविध जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
शेतकामासाठी जात असलेल्या गुंज येथील महिला मजुरांचा विहिरीत ट्रॅक्टर पडून एप्रिलमध्ये मृत्यू झाला होता. त्यांना घरकुल योजनेचा लाभदेण्यासाठी वाढीव गावठाणाचा प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश दिले. तसेच घरकुल लाभार्थ्यांना २ ब्रॉस मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे निर्देशही बोडर्डीकर यांनी दिले.