हिंगोली ः जिल्ह्यात एकीकडे निधी नसल्याचे सांगितले जात आहे तर दुसरीकडे 15 व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायत स्तरावरील 60 कोटींचा निधी का पडून आहे असा सवाल करीत सदर निधी पुढील दोन महिन्यांत खर्च करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी समन्वय समितीच्या बैठकीत दिला.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियांका राजपूत, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, संदीप सोनटक्के, आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांच्यासह गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.
पंचायत विभागाचा 15 व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतस्तरावरील 60 कोटी रुपयांचा निधी अखर्चित असल्याचे दिसून अल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे निधी नाही अशी ओरड असताना दुसरीकडे कोट्यवधींचा निधी का अखर्चित आहे असा सवाल त्यांनी केला. सदर निधी पुढील दोन महिन्यांत खर्च करावा. काही दिवसांतच ग्रामपंचायतींना भेटी देणार आहे. त्या ठिकाणी कामे सुरू नसल्यास दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.
या शिवाय दिव्यांगांचा पाच टक्के निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आगामी काळात ग्रामीण भागातून पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेची अपूर्ण कामे गतीने पूर्ण करावीत सदर कामे करतांना कामाचा दर्जा राखण्याच्या सूूचनाही त्यांनी दिल्या.
या सोबतच वैयक्तिक लाभाच्या योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. घरकुल योजना, सिंचन विहीर, गोठ्यांची कामे तातडीने पूर्ण झाली पाहिजेत याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. हिंगोली जिल्हा परिषदेत सकाळी अकरा वाजता बैठक सुरू करण्यात आली. प्रत्येक विभागाचा मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी योजनानिहाय आढावा घेतला.
बैठकीत पंचायत समिती स्तरावरील कामांबाबत माहिती घेताना एका अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर दुसराच अधिकारी उत्तर देत असल्याने गायकवाड चांगलेच संतापले. तुम्हाला विचारले का तुम्ही खाली बसा अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्याला फटकारले.