Water Crisis  pudhari
हिंगोली

Hingoli water crisis : मुबलक पाणीसाठा असूनही हिंगोलीकरांच्या नशिबी कोरडच

१० ते १२ दिवसांआड होतोय पाणीपुरवठा, टँकरला मोठी मागणी

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : धरण उशाला आणि कोरड घशाला अशी काहीशी विचित्र आणि संतापजनक परिस्थिती सध्या हिंगोली शहरात पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हात नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाचे पाणी नियोजन सपशेल चूकत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शहरात कुठे ८ तर कुठे १२ दिवसांनंतर पाणी येत असल्याने हिंगोलीकरांमध्ये प्रशासनाविर-ोधात नाराजीचा सूर उमटत आहे. हिंगोली शहराची संपूर्ण तहान सिद्धेश्वर धरणावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणात सद्यस्थितीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार पाणी असूनही केवळ नियोजनाच्या अभावामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आम्ही पाणीपट्टी नियमित भरतो, मग प्रशासनाने आम्हाला वेळेवर पाणी का देऊ नये? ऐन उन्हाळ्यात खाजगी टँकरसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. हे प्रशासनाचे अपयश आहे, अशी संतप्त भावना एका नागरिकाने व्यक्त केली.

चार दिवसांपूर्वी डिग्रस कऱ्हाळे येथील केंद्रातील वीजरोहित्र जळाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे पाणी उपसा थांबला आणि शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. तांत्रिक बिघाड ही एक वेळची समस्या असू शकते, परंतु नागरिकांच्या मते, हा केवळ एक बहाणा आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये एरवीही पाणी नियमित येत नाही. कागदावर नियमित पुरवठा दाखवणारी नगरपालिका प्रत्यक्षात मात्र ८ ते १२ दिवसांच्या अंतराने नळ सोडत आहे.

  • शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असताना खाजगी टँकरचालकांचे मात्र फावले आहे. एका टँकरसाठी नागरिकांना ८०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना हा आर्थिक भुर्दंड सहन होत नाहीये. प्रशासनाने तांत्रिक बिघाड लवकर दुरुस्त करून पर्यायी व्यवस्था उभी करणे अपेक्षित होते, मात्र ढिम्म प्रशासनामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT