Veltura clash 20 injured
सेनगाव : सेनगाव तालुक्यातील वेलतूरा येथे मंगळवार (30 सप्टेंबर) रोजी रात्री दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गट आमनेसामने येत तुफान हाणामारी झाली. गाणे वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या या भांडणात गावात मोठा गोंधळ उडाला. या घटनेत 24 जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी चार जण अत्यवस्थेत आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर व रिसोड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित वीस जखमींचे हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून एकूण 49 जणांवर गुन्हा नोंदवला आहे. घटनास्थळावर पोलिसांनी तत्काळ धाव घेत दहा जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपअधीक्षक राजकुमार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, तसेच सेनगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठा व वंजारी समाजात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावर उपाय म्हणून महसूल व पोलीस प्रशासनाने शांतता समितीची बैठक आयोजित करून सलोखा राखण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील दुर्गा विसर्जन मिरवणुकीत पुन्हा हाणामारी झाली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
"गावात शांतता बिघडवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्व समाजबांधवांनी सलोखा राखावा."सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के