

Heavy rain wreaks havoc in Hingoli district
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू नदीसह जिल्ह्यातील इतर लहान, मोठ्या ओढ्यांना महापूर आल्याने कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसले. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली. वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात अतिवृष्टीमुळे पाणी घुसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले. संततधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली.
जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असून या पावसामुळे कयाधू नदीला पुर आला. पुराचे पाणी नदीकाठच्या शेतांमध्ये शिरले होते. या शिवाय नाल्यांच्या पुरामुळे शेती पिकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा गावातील आरामशीनच्या पाठीमागच्या वस्ती मध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्याने गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले तर पांगरा शिंदे गावातून ओढ्याचे पाणी वाहू लागले असून काही घरांच्या उंबरठ्याला पाणी लागल्याचे गावकरी सोपान शिंदे यांनी सांगितले.
या शिवाय वापटी गावालगत असलेल्या ओढ्याचे पाणी पुलावरून वाहात असून त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. कळमनुरी तालुक्यातील कुपटी गावालगत असलेल्या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहात असून तलावाच्या एका कोपऱ्यातील काही भाग वाहून गेल्याने तलावाचे पाणी परिसरातील शेतात शिरल्याचे माजी सरपंच जुबेर पठाण, नदीम पठाण यांनी सांगितले. तर हिंगोली ते समगा मार्गावरील लहान पुलावरून पाणी वाहात असल्याने समगा रस्ता बंद झाला आहे.