Crime News Pudhari
हिंगोली

Hingoli Crime | वसमत तालुक्यातील पेट्रोल पंपावर धारदार शस्त्राने हल्ला; कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

चोंडी-आंबा टी-पॉईंटवरील पेट्रोल पंपावरील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Vasmat Petrol Pump Attack

वसमत : वसमत तालुक्यातील चोंडी-आंबा टी-पॉईंट परिसरात मंगळवारी (दि. ६ ) दुपारी धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या आवारात एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनशी संबंधित कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वसमत-औंढा रोडवरील चोंडी टी-पॉईंट येथील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्ला करणारा आरोपी अद्याप अज्ञात असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरवली असून, घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मृत व्यक्तीची संपूर्ण ओळख, हल्ल्यामागील नेमके कारण तसेच आरोपीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेमुळे चोंडी-आंबा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुरुंदा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT