

कळमनुरी : जुन्या बसस्थानक परिसरात १५ जुलै रोजी झालेल्या लुकमान सिद्दीकी यांच्या खूनप्रकरणी हिंगोली पोलिसांनी संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध ‘मकोका’ची कारवाई केली आहे. मकोकाच्या कलम ३(१)(i), ३(२) व ३(४) अंतर्गत कारवाईस नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे.
या प्रकरणात एकूण १७ आरोपींपैकी १३ जणांना अटक करण्यात आली असून, शस्त्रे, वाहने तसेच डिजिटल व तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी केला. त्यानंतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला.
संघटित टोळीच्या माध्यमातून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मकोकाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मंजुरीनंतर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एन. एस. देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.