Vasmat Municipal Council Encroachment
वसमत : वसमत नगर परिषदेच्या मालकीच्या जागेच्या कथित नामांतरणाच्या हालचालींवरून शहरातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्व्हे क्रमांक 180 मधील घर क्रमांक A/505 ही जागा नगर परिषदेच्या मालकीची असल्याचा दावा करत काही नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून सदर जागेचे नामांतरण तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, संबंधित जागेवर नगर परिषद कार्यालयाचे कॉम्प्लेक्स, आठवडी बाजार, ओपन स्पेस तसेच जनता मार्केट परिसराचा काही भाग येत असून ही जागा सार्वजनिक उपयोगाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र काही व्यक्तींकडून या जागेवर तारांचे कुंपण करून ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेच्या नामांतरणाची प्रक्रिया दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत झाल्याची चर्चा असून त्यामुळे नगर परिषदेच्या मालकी हक्कावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी नगर परिषद प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित कुंपण हटवावे, जागा पुन्हा नगर परिषदेच्या ताब्यात घ्यावी आणि नामांतरण प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर नगरसेविका रेणुका संजय भोसले, डॉ. रेणुका गजानन पतंगे, प्रभाकर क्षीरसागर, राजेश लक्ष्मणराव पवार, शेख मोहम्मद कामरान, शेख युनूस आणि शकुंतला गोपाळराव सातपुते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला असून नगर परिषदेच्या जागेवर नेमका कोणाचा डोळा आहे, याची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
"सार्वजनिक मालमत्ता वाचवा" नगर परिषदेच्या मालकीच्या जागेच्या संरक्षणासाठी लोकप्रतिनिधी मैदानात उतरल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.