Vasmat Farmers Rescued
वसमत : वसमत तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सर्वच नदी नाल्यांना पूर आले असून वसमत शहराच्या जवळून गेलेल्या उघडी नदीलाही पूर आल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये कालपासून अडकलेल्या शेतकऱ्यांना सुखरूप काढण्यात यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मारलापूर शिवारातील कृष्णमंदिर ते मधला किन्होळा मार्गाच्या उघडी नदीवर एक पूल आणि दोन ओढे आहे. त्याच्या शेजारील शेतकरी शेतीची दैनंदिन कामे करण्यासाठी सोमवारी आपल्या शेतात गेले होते. मुसळधार पावसामुळे अचानक नदीला पाण्याचा प्रवाह वाढल्याने काही लोक शेतातच रात्रीपासून अडकले होते.
पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने शेतकरी शाम भोसले, बबन साखरे, दिगंबर भोसले हे काल पासून अडकून बसले होते. स्थानिक लोकांना याची माहिती मिळताच आज सकाळी दोरीच्या साहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
यावेळी संजय भोसले, नगरसेवक दिलीप भोसले, काशिनाथ भोसले, अंबादास भोसले, दिगंबार साखरे, भिमराव भोसले, मदन भोसले, शिवहार साखरे, गोविंद भोसले, राजेश चव्हाण, कृष्णा भोसले आदीसह शेतकऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.