Vasmat Police
वसमत: पोलीस असल्याचे सांगून एका निवृत्त शिक्षकाची भररस्त्यात लूट केल्याची घटना वसमत शहरात घडली आहे. दोन भामट्यांनी चलाखीने शिक्षकाच्या हातातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी लंपास केली असून याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी गुंडीबा नागोराव थोरात (वय ६६, रा. पंचशील नगर, वसमत) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ते वसमत-औंढा मार्गावरील राजश्री शाहू अपंग विद्यालयाजवळून पायी जात होते.
त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवले. आम्ही पोलीस असून परिसरात चोऱ्या वाढल्या आहेत, असे सांगून अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. बोलण्यात गुंतवून फिर्यादीच्या हातातील सुमारे सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून दोघांनी तेथून पलायन केले.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार दि. २१ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अज्ञात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पथकाकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
अनोळखी व्यक्ती स्वतःला पोलीस म्हणून सांगून अंगझडती किंवा दागिने काढण्यास सांगत असेल. तर नागरिकांनी त्याला बळी पडू नये. तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी केले आहे.