Vasmat Donwada Murder Case
हिंगोली : वसमत तालुक्यातील डोणवाडा येथे घरासमोर फटाके का फोडले तसेच वारंवार त्रास का देतो?, या कारणावरून एका तरुणाला झाडाला बांधून जबर मारहाण झाली. या मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या वडिल व मुला विरुध्द शनिवारी (दि.३१) कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील कैलास स्वामी (३०) हे त्यांच्या मित्रासोबत दुचाकी वाहनावर तेथून जवळच असलेल्या डोणवाडा येथे शुक्रवारी रात्री दुचाकी वाहनावर गेले हाेते. यावेळी त्यांनी गावातील बालाजी तमेवार याच्या घरासमोर फटाके फोडले. यावरून बालाजी याने कैलास व त्यांचा मित्र मारोती यांना जाब विचारण्यास सुरवात केली. त्यातून शाब्दीक चकमक झाली. सदर प्रकरण हातघाईवर आल्यानंतर मारोती याने तेथून पळ काढला. मात्र कैलास हे बालाजी व त्याचा मुलगा होनाजी तमेवार यांच्या तावडीत सापडला.
यावेळी बालाजी व होनाजी या दोघांनी कैलास यांना शिवीगाळ केली. तु आमच्या घरा समोर फटाके का फोडले तसेच आम्हाला त्रास का देतो या कारणावरून कैलास यांना दोरीने एका झाडाला बांधून काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. दोघांकडून होत असलेल्या जबर मारहाणीमुळे कैलास याने मदतीसाठी आरडा ओरड केली मात्र कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कैलास बेेशुध्द होऊन पडला.
त्यानंतर काही जणांनी कैलास यांच्या कुटुंबियांना तो डोणवाडा येथे बेशुध्द अवस्थेत पडल्याची माहिती दिली. त्यावरून त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बेशुध्द असलेल्या कैलास यास उपचारासाठी कुरुंदा येथे नेला. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंदारे, उपनिरीक्षक पंढरी गंधकवाड, जमादार राजीव जाधव, गजानन भालेराव यांच्या पथकाने तातडीने रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.
यामध्ये डोणवाडा येथे मारहाण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने रात्रीच डोणवाडा गाठून बालाजी व होनाजी यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी विलास स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालाजी तमेवार व त्याचा मुलगा होनाजी तमेवार यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मारहाणीत गंभीर जखमी होऊन बेशुध्द झालेल्या कैलास यांना तेथेच सोडून बालाजी व होनाजी यांनी कैलास यांचे दुचाकी वाहन पेटवून दिले. दुचाकी वाहन जळून खाक झाले आहे.