हिंगोली/वसमत, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यात पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईत २१ लाख ३० हजार रुपयांची रक्कम जप्त केली. हिंगोली, वसमत येथून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. हिंगोली शहरातील पीपल्स बैंक परिसरात दुचाकीवरून बॅगमध्ये १४ लाख ५० हजारांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले, सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पंचनामा करून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. वसमत येथे कारंजा चौक भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी वाहनातून ४ लाख ८० हजार रुपयांची दुपारी चार वाजता जप्त केली. या रकमेबाबात दुचाकीधारक कोणताही खुलासा करू न शकल्याने रक्कम कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभाग सतर्क झाला असून मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे प्रकार टाकण्यासाठी सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी स्वतंत्र पोलिस पथके स्थापन करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील सीमानाक्यावर विशेष तपासणी नाके उभारण्यात आली आहेत. रविवारी रात्री वसमत येथील मदिना चौक भागात एका वाहनात पैसे असल्याची माहिती मिळाल्यावरून वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या पथकाने दोन लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. भरारी पथकाचे अधिकारी आदिनाथ पांचाळ यांनी जिल्ह्यात झालेल्या या कार्यवाहीस दुजोरा दिला.