वसमत : वसमत येथील कारंजा चौक परिसरात नाकाबंदीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दुचाकीतून ४ लाख ८० हजारांची रोकड सोमवारी (दि.११) दुपारी ४ वाजता जप्त केली.
हिंगोली जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. मतदारांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचे प्रकार होऊ नये, यासाठी नाकाबंदी करून पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू आहे. यासाठी स्वतंत्र पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय हिंगोली जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या तसेच हिंगोली जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची स्थिर पथकाद्वारे तपासणी केली जात असून त्यासाठी तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत. या तपासणी नाक्यांवर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या पथकाने अचानक भेट देऊन पाहणी केल्याने तपासणी नाके सतर्क झाले आहेत.
दरम्यान वसमत येथील मदिना चौक भागात एका वाहनात पैसे असल्याची माहिती मिळाल्यावरून वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या पथकाने रविवारी (दि.१०) रात्री दोन लाखाची रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी अद्यापही चौकशी सुरु झाली आहे. त्यानंतर सोमवारी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार आझम प्यारेवाले, नितीन गोरे, हरिभाऊ गुंजकर, आकाश टापरे यांच्या पथकाने वसमत शहरात वाहनांची तपासणी सुरु केली होती. यामध्ये कारंजा चौक भागात एका दुचाकीच्या डिक्कीमध्ये ४ लाख ८० हजाराची रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांनी या रकमेबाबत दुचाकीस्वाराकडे विचारणा केली असता त्यास समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम जप्त करून निवडणुक विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी आदिनाथ पांचाळ यांच्याकडे सुपुर्त केली आहे. या रकमेबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.