हळद भिजल्याने शेतकरी संतप्त; हिंगोली बाजार समितीत लिलाव बंद pudhari photo
हिंगोली

Hingoli turmeric farmers protest : हळद भिजल्याने शेतकरी संतप्त; हिंगोली बाजार समितीत लिलाव बंद

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडत गेटला फासले काळे

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली जिल्हा हा पिवळ्या सोन्याचा अर्थात हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना आता हळद उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी हळद खरेदी करणारी बाजारपेठ म्हणून हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मात्र, बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे मंगळवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची हळद भिजली. त्यामुळे क्रांतीकारी शेतकरी संघटनेने बुधवारी बाजार समितीतील लिलाव बंद पाडत मुख्य गेटला काळे फासून बाजार समिती प्रशासनाचा निषेध केला.

मंगळवारी झालेल्या अचानक पावसामुळे बाजार समिती परिसरातील शेतकऱ्यांची हळद पूर्णतः भिजून मोठे नुकसान झाले. यामुळे संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलन छेडले. शेतकऱ्यांची हळद काळी झाली या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या मुख्य गेटला काळे फासले. त्यानंतर संतप्त शेतकरी मोठ्या संख्येने मार्केट कमिटीमध्ये दाखल झाले. यावेळी हळदीचे दर घसरल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या हळदीला योग्य दर मिळत नसल्याने आणि खरेदी प्रक्रियेमध्ये होत असलेल्या विलंबामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही काळासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव बंद पाडला. यानंतर पोलिसांनी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव नारायण पाटील यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांचा संताप शांत करण्याचा प्रयत्न केला.

बाजार समिती प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांची हळद योग्य दराने खरेदी करण्यात येईल, खरेदीसाठी जास्त वेळ लागणार नाही तसेच भविष्यात कोणत्याही शेतकऱ्यांची हळद भिजणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करत लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ दिली. बाजार समितीने माल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

  • या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, चैतन्य चव्हाण, सखाराम भाकरे, विठ्ठल वायचाळ, राम चव्हाण, संतोष सावके, संदीप पाटील, मनोहर पाटील, अशोकराव जयस्वाल,विशाल पोळ आदी पदाधिकारी व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT