Pudhari
हिंगोली

Hingoli ST Stand | अर्ध्या तिकीटाच्या वादातून एसटी वाहकावर टोळक्याचा हल्ला; संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, बससेवा ठप्प

र्ध्या तिकीटाच्या मुद्द्यावर एका प्रवाशाचा वाहक संजय लक्ष्मण अडकीने यांच्याशी वाद

पुढारी वृत्तसेवा

ST Bus Conductor Attacked

हिंगोली : तिकीटाच्या वादातून एसटी वाहकावर १० ते १५ जणांच्या टोळक्याने बसस्थानकात घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सकाळी सुमारे ११ वाजता हिंगोली बसस्थानकात घडली. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी आगाराचे प्रवेशद्वार बंद करून ठिय्या आंदोलन छेडले. त्यामुळे काही काळ हिंगोली आगारातील बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली.

माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ७ वाजता हिंगोली आगाराची बस केंद्रा मार्गावर रवाना झाली होती. केंद्राहून हिंगोलीकडे परत येत असताना अर्ध्या तिकीटाच्या मुद्द्यावर एका प्रवाशाचा वाहक संजय लक्ष्मण अडकीने यांच्याशी वाद झाला. बस हिंगोली बसस्थानकात पोहोचताच १० ते १५ जणांचे टोळके बसमध्ये घुसले आणि वाहक अडकीने यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांसह ठोसे मारत बेदम मारहाण केली. या मारहाणीत अडकीने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या गणवेशावर रक्ताचे डाग पडले होते. बसस्थानकावरील कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावून आल्याने पुढील अनर्थ टळला. जखमी वाहकाला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी दोन हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर इतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी चालक-वाहकांनी आगाराचे प्रवेशद्वार बंद करून ठिय्या आंदोलन सुरू केले. सर्व आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. त्यामुळे हिंगोली आगारातील बससेवा काही काळ ठप्प झाली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे आणि पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांनी बसस्थानकाला भेट देऊन आंदोलक कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली; मात्र सर्व आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT