Special Intensive Revision 2026
हिंंगोली : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ च्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार गणना प्रपत्रांचे वितरण आणि संकलन ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या या प्रक्रियेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश सरवदे यांनी केले आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गणना प्रपत्रे तयार करणे आणि मुद्रित करण्याची प्रक्रिया १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत संबंधित मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण करून त्यांचे संकलन करण्यात येईल. संकलित गणना प्रपत्रांचे (ईएफ) स्कॅनिंग करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमातील पुढील टप्प्यात ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत नोटीस प्रक्रिया तसेच दावे आणि हरकतींचा निपटारा करण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत संबंधित मतदारांना गणना प्रपत्रे आणि त्यासोबत आवश्यक सूचना वितरित केल्या जातील. ज्या मतदारांकडे मोबाईलवर व्हॉट्सॲप सुविधा उपलब्ध आहे, त्यांना पूर्ण भरलेल्या गणना प्रपत्राची प्रत व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात येणार आहे. तर व्हॉट्सॲपची सुविधा नसलेल्या मतदारांना स्वतंत्र पोचपावती दिली जाणार आहे.
सुधारित वेळापत्रकाची सर्व राजकीय पक्ष, नागरिक आणि पात्र मतदारांनी नोंद घ्यावी. मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या या प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश सरवदे यांनी केले आहे. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील पात्र मतदारांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार हरीश गाडे यांनी केले आहे.