हिंगोली : स्मार्ट मीटर विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक. 
हिंगोली

Hingoli smart meter protest : स्मार्ट मीटरविरोधात हिंगोलीकरांचा वीज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा

मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पुष्पहार घालून गांधीगिरी केली.

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : शहरासह जिल्हाभरात बसविल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरच्या विरोधात हिंगोलीकर एकवटले असून मंगळवारी हिंगोली येथे वीज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पुष्पहार घालून गांधीगिरी केली. जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

शहरात वीज कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. ग्राहकांची मागणी नसतांनाही जूने मिटर बदलून स्मार्ट मीटर दिले जात आहेत. त्यामुळे ग्राहक व यंत्रणेवर अनावश्यक आर्थिक भार टाकला जाणार आहे. स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, सोलार ग्राहकांवरील ग्रिड सपोर्ट चार्जेस रद्द करावेत, मिटर रीडिंगमधील तफावती दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार संतोष बांगर, नंदकिशोर तोष्णीवाल, उपनगराध्यक्ष माबूद बागवान, पालिकेचे गटनेते श्रीराम बांगर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नाना नायक, राम कदम, अनिल नेनवाणी पंकज अग्रवाल, शेख नईम शेख लाल, जगजीत खुराणा, सुमीत चौधरी, रवी नेनवाणी, शेख खलील बेलदार, कैलास शहाणे, केशव दुबे, शेख जुबेर, नितीन राठौर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

हिंगोली शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला मोर्चा वीज कंपनीच्या कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी मोर्चेकऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करीत अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश केला.

स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले त्या ठिकाणचे मीटर काढून जुने मीटर बसविण्याची मागणी करण्यात आली.

  • मोर्चा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुष्पहार घालून गांधीगिरी करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मागण्यांबाबत वरिष्ठांकडे कळविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT