हिंगोली ः तलाव सुशोभीकरणाच्या कामास मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी भेट देऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.  pudhari photo
हिंगोली

Hingoli lake beautification project : तलावाच्या सुशोभीकरणाने शहराच्या सौंदर्यात भर पडणार

14 कोटींच्या निधीतून होणार काम, सीईओंनी केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणानंतर आता सिरेहकशाह बाबा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम केले जाणार असून सध्याच्या स्थितीत 14 कोटी रुपये खर्चून सांडव्याच्या कामासह संरक्षण भिंतीचे काम केले जात आहे. या शिवाय तलावातील गाळ काढण्याचे कामही हाती घेण्यात आले असून यामुळे तलावात तब्बल 932 टीसीएम पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होणार असून तलावाच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

शहरात जलेश्वर तलाव व सिरेहकशाह बाबा तलाव आहेत. या तलावामध्य्‌े दरवर्षी कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा होतो. मात्र मागील काही वर्षात या तलावाच्या सुशोभीकरणाची मागणी केली जात होती. त्यानुसार जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून या ठिकाणी संरक्षण भिंत, सांडव्याचे काम करण्यात आले आहे. या शिवाय तलावातील गाळ काढल्यामुळे तलावातील पाणीसाठा वाढला आहे. सध्या तलावाचे काम सुरू आहे.

दरम्यान, शहरातील 142 एकर क्षेत्रावर सिरेहकशाह बाबा तलावाच्या दुरुस्तीसोबतच सुशोभीकरणाचे काम हाती घेण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार तलावातील गाळ काढणे आवश्यक असल्याने सध्या मृद व जलसंधारण विभागाकडून तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे तलावात पाणीसाठा वाढणार आहे. तलावात साठलेले पाणी पावसाळ्यात पाणी वाहून जाऊ नये यासाठी 630 मीटर लांबीची संरक्षण भिंतीचे बांधकाम केले जात आहे.

या शिवाय दर्गाह परिसरात पाण्याची धोका निर्माण होऊ नये यासाठी 197 मीटरची भिंत बांधली जात आहे. याशिवाय सांडव्याचे कामही केले जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, अभियंता उमेश अलमुलवाड यांच्या पथकाने कामकाजाची पाहणी केली.

सदर कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तलावातील गाळ काढणे व संरक्षण भिंतीमुळे तलावात तब्बल 932 टीसीएम पाणीसाठा होणार आहे. यामुळे परिसरात भूगर्भात पाणी पातळी वाढणार असून त्याचा नागरिक व शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

  • या तलावाचे पर्यटन विकास योजनेतून सुशोभीकरण करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या आहेत. त्यानुुसार तलावात बोटिंगसह पर्यटनस्थळ विकसित केले जाणार असून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT