Illegal sand transport pudhari photo
हिंगोली

Hingoli Illegal Sand | अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परसह चालकावर कारवाई; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

सेनगाव पोलिसांची रेतीमाफियांविरुद्ध कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Sengaon Police Action

सेनगाव : सेनगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध सेनगाव पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परसह चालकावर पोलिसांनी २३ ऑगस्ट रोजी रात्री कारवाई करत तब्बल सात लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला आळा घालण्यासाठी सेनगाव पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २३ ऑगस्ट रोजी रात्री वडहिवरा येथील गणेश संतोष कोकाटे हा विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या शासनाचा महसूल बुडवून वाळूची वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश शेट्टीवार, बीट जमादार जीवन मस्के, जयस्वाल यांच्या पथकाने कारवाई करत कोकाटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लेलँड कंपनीचा पिवळ्या रंगाचा हायबॉडी टिप्पर (क्र. एमएच ३८ एई १४१४) जप्त करण्यात आला. या टिप्परची किंमत सात लाख रुपये असून त्यामध्ये दोन ब्रास अवैध वाळू आढळून आली. या वाळूची किंमत सुमारे दहा हजार रुपये आहे.

अशा प्रकारे पोलिसांनी एकूण सात लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे सेनगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, वाळूमाफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाळूमाफियांची आता खैर नाही

सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे आणि गैरप्रवृत्ती मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या वाळू उपसा अथवा विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अशा गैरप्रवृत्तींमध्ये सहभागी असणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT