केंद्रा बुद्रुक येथील गाव तळ्यातील जल जीवन मिशनची अर्धवट विहीर. लाल माती ढासळल्याने बांधकाम बंद पडले आहे. Pudhari
हिंगोली

Hingoli News | केंद्रा बुद्रुकमध्ये पाण्यासाठी वणवण; जल जीवनची विहीर तळ्यातच अडकली

ठेकेदार व भूजल विभागाच्या दिरंगाईमुळे निधी लॅप्स होण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

Sengaon Water Crisis

केंद्रा बुद्रुक (ता. सेनगाव) : केंद्रा बुद्रुक (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गाव तळ्यात खोदलेली विहीर अर्धवटच पडून असल्याने गावात ८ ते १० दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. सध्या जुन्या विहिरीवरूनच कसाबसा पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्हाधिकारी यांनी जल जीवन मिशनची रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले असतानाही केंद्रा बुद्रुक येथील काम रखडलेच आहे. त्यामुळे नवीन जागेचे सर्वेक्षण करून गावकऱ्यांची अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे.

तळ्यात विहीर, लाल मातीत अडकली

गावात पाणीटंचाई लक्षात घेऊन नवीन विहिरीची मागणी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या भूजल विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. मात्र पाणी नसल्याचे कारण दाखवत गाव तळ्यातच विहीर खोदण्यात आली. तळ्यातील लाल मातीत विहीर खोदताच माती ढासळून पडली आणि विहिरीचे बांधकाम तिथेच बंद पडले. तेव्हापासून विहीर अर्धवट अवस्थेतच आहे. तिला रिंग, कठडा, कोणतेही बांधकाम नाही.

ठेकेदार व भूजल विभागाने सर्वेक्षण न केल्यास निधी लॅप्स होणार

ग्रामसेवक श्री. सपकाळ विहिरी बद्दलचे माहिती विचारले असताठेकेदारांनी तसेच भूजल विभागाने लवकर नवीन ठिकाणी भूजल सर्वेक्षण न केल्यास विहिरीसाठी आलेला निधी लॅप्स होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावाचे मोठे नुकसान होणार आहे.

सध्या ८ ते १० दिवसांनी पाणी येत असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यापूर्वीच ही अवस्था असल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. अर्धवट विहीर अशीच उघडी पडून असल्याने लहान मुले व जनावरांसाठी ती धोकादायक बनली आहे.

त्यामुळे ठेकेदार व भूजल विभागाने तातडीने नवीन जागेचे सर्वेक्षण करून योग्य ठिकाणी विहीर खोदावी, अन्यथा गावाचा निधी वाया जाणार आहे, अशी मागणी केंद्रा बुद्रुक येथील नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT