Hingoli Sengaon Gold Theft
सेनगाव : येथील गाडे ज्वेलर्स सराफी दुकान फोडून चोरट्यांनी लाखोंचे दागिने पळविल्याची घटना मंगळवारी (दि.८) पहाटे घडली आहे. यावेळी चोरट्यांनी एका रखवालदारास मारहाण केली आहे. घटनास्थळी सेनगाव पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सेनगाव येथील नगरपंचायती जवळ मुख्य बाजारपेठेत मधुकर गाडे यांचे गाडे ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. सोमवारी (दि. 7) रात्रीच्या सुमारास गाडे हे दुकान बंद करून गावी रिधोरा येथे गेले होते. पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अंगात काळे रेनकोट व तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर दोन चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर सोन्या चांदीचे दागिने एका सॅक बॅगमधे भरून घेतले.
दरम्यान, यावेळी दुकानात चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर बाजूच्या दुकानाच्या रखवालदाराने ओरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेर असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना मारहाण करून शांत बसविले. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील सुमारे सहा ते आठ लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार सुभाष जाधव यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच सराफा व्यापारी मधुकर गाडे देखील आले. पोलिसांनी दुकानातील तसेच दुकानाबाहेरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दोन चोरटे दुकानात चोरी करीत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक दिलीप मोरे यांच्यासह अधिकाऱ्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.