

कळमनुरी : शहरातील एका पान टपरीवर सराफ व्यापा-याने विसरलेली सुमारे दोन लाख रोकड असलेली बॅग परत करीत पान टपरी चालकाने आपला प्रामाणिकपणा दाखवला.
याबाबत माहिती अशी की, शहरातील सराफ व्यापारी शिवसेना नेते संतोष सारडा हे व्यवसायिक कामासाठी जवळपास दोन लाखाची रक्कमेची बॅग घेत जुना बस्थानकावर हिंगोलीला जाण्यासाठी थांबले असता तेथे असलेल्या पान टपरीवर पान खान्यासाठी गेले व तेथे बॅग विसरुन हिंगोलीला निघाले.
पान टपरी चालक अनिस पठाण यांच्या नजरेत विसरलेली बॅग आली. त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात रोकड दिसताच ही बॅग सारडा यांची असल्याचे ध्यानात आले. ही बाब त्यांनी तत्काळ तेथे उभे असलेले सुनील भोसकर यांना सांगितली.
इकडे प्रवासादरम्यान सारडा यांना आपल्या जवळ बॅग नसल्याचे लक्षात येता ते गोंधळून गेले. पण त्याच वेळेत त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवत अनिस पठाण यांनी बॅग आपल्याकडे व रक्कम सुरक्षित असल्याची माहिती दिली. यामुळे सारडा यांनी परत येत आपली बॅग घेत तपासणी केली असता बॅगेतील रक्कम पूर्ण मिळाली.
अनिस पठाण हे मध्यम वर्गातून पान टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करीत असताना त्यांनी तब्बल दोन लाखाची रक्कम परत करीत आपला प्रामाणिकपणा दाखवला. तसेच सारडा यांनी देऊ केलेली बक्षीस रक्कम ही घेण्याचे टाळले. याबद्दल सारडा यांनी अनिस पठाण व सुनील भोसकर यांचा शाल हार देऊन सत्कार केला. दरम्यान अनिस पठाण यांच्या प्रामाणिकपणा बद्दल शहरात त्यांचे अभिनंदन होत आहे.