Dhangarwadi Farmers Well Atmaklesh Andolan
सेनगाव : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या अनुदानात अपहार झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १३) अनोखे आंदोलन छेडले. विहिरीत उतरून ‘विहीर आत्मक्लेश’ आंदोलन करत संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तसेच या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याची मागणी करण्यात आली आहे.
धनगरवाडी येथील रामचंद्र खडसे यांच्या शेतात मनरेगा योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी मंजुरी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात विहिरीचे काम न करता सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचे अकुशल देयक काढण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे शेतात विहीर नसतानाही काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. या प्रकाराबाबत खडसे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार देत ‘विहीर चोरीला गेली’ असा आरोप केला होता.
या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांच्या पथकाने तपास केला असता संबंधित शेतात विहीर नसल्याचे निदर्शनास आले. याशिवाय इतर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार सात ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्यापैकी चार ठिकाणी विहिरीचे कामच झाले नसल्याचे आढळून आले, तर एका ठिकाणी विहिरीची मंजुरी एका गटात आणि खोदकाम दुसऱ्या गटात दाखविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भातील अहवाल नायब तहसीलदार वाघुंडे यांनी प्रशासनाकडे सादर केला आहे.
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात पालक तांत्रिक अधिकारी के. बी. देशपांडे आणि ग्रामरोजगार सेवक मनोज खडसे यांच्या विरोधात ६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील इतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी श्रीराम जगताप, रामचंद्र खडसे, विनोद खडसे, रुस्तुमा होळपादे, बळीराम रवणे, प्रल्हाद गबारे, माधव खडसे आणि गौरव पाळते यांनी विठ्ठल तिडके यांच्या शेतातील विहिरीत उतरून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनीही आंदोलनस्थळी भेट देत विहिरीत उतरून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.
दरम्यान, दुपारपर्यंत पंचायत समितीचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.