हिंगोली : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारू नये. निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी दिला आहे.
जिल्ह्यातून मोठ्या संख्येने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस धावतात. छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई यासह इतर लांबपल्याच्या बसगाड्यांच्या समावेश आहे. मात्र सण उत्सवामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन खाजगी बसेसकडून अव्वाच्या सव्वा दर आकारल्या जात असल्याच्या तक्रारी होतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची आर्थिक लूट रोखणे, सुरक्षित प्रवासी वाहतूक सुनिश्चित करणे आणि खाजगी बस वाहतुकीतील अनियमितता दूर करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने २० नोव्हेंबर पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
शासनाच्या निर्णयानुसार खाजगी कंत्राटी प्रवासी बसचे भाडे संबंधित संवर्गातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतुकीच्या भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आकारता येणार नाही. खाजगी बस ऑपरेटरनी शासननिर्धारित कमाल भाडेदराचे पालन करावे. तसेच कमाल भाडेदराचा तक्ता आपल्या कार्यालयात दर्शनी भागात प्रदर्शित करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष तपासणी मोहिमेदरम्यान विनापरवाना किंवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहतूक करणे, बेकायदेशीर टप्पा वाहतूक, अवैध मालवाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र व मोटार वाहन कराची तपासणी, वाहनातील बेकायदेशीर फेरबदल तसेच निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारणी या बाबी तपासण्यात येणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
यासोबतच वाहनांमधील अग्रिशमन यंत्रणा, आपत्कालीन निर्गमन दरवाजा, पॅनिक बटन, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेललाईट व वायपर कार्यरत असल्याची खात्री करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
खाजगी बस ऑपरेटरकडून निर्धारित भाडेदापेक्षा अधिक रक्कम आकारण्यात येत असल्यास प्रवाशांनी भाड्याची पावती किंवा तिकिटासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे तक्रार नोंदवावी. प्रवाशांनी प्रवासापूर्वी भाडेदराची खात्री करून घ्यावी आणि जादा भाडे आकारणीस बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.