JEE-25 India Rank 4
हिंगोली: फार्मसी क्षेत्रातील सर्वोच्च व प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नायपर JEE 2025 (National Institute of Pharmaceutical Education and Research - Joint Entrance Examination) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत हिंगोलीचे सुपुत्र रितेश रामराव पडोळे यांनी सामान्य आर्थिक दुर्बल घटक (GEN-EWS) प्रवर्गातून देशात चौथा क्रमांक (AIR 4) मिळवून हिंगोली जिल्ह्याचा तसेच महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.
रितेश पडोळे यांनी आपल्या अथक परिश्रम, चिकाटी आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. नायपर JEE ही परीक्षा फार्मास्युटिकल शिक्षण व संशोधनासाठी देशातील सर्वोच्च दर्जाची परीक्षा मानली जाते. या परीक्षेद्वारे देशातील विविध नायपर संस्थांमध्ये MS (Pharm), M.Pharm, MBA (Pharm), आणि Ph.D. यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो.
रितेशने आता भारतातील सर्वोत्कृष्ट औषधशास्त्र शिक्षणसंस्था NIPER मोहाली येथे प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असून, पुढे संशोधन व औषधनिर्माण क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा त्यांचा मानस आहे.
त्यांच्या यशामागे कुटुंबाचा पाठिंबा, स्वतःची शिस्तबद्ध अभ्यासपद्धती, आणि जिद्द यांचा मोठा वाटा आहे. रितेश यांनी यापूर्वीही GPAT परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. रितेशच्या या यशाबद्दल गावकरी जडगाव सह पंचक्रोशीतीतून कौतुक होत आहे.
मी हे यश माझी आई सुनीता, वडील रामराव, काका प्रा.साहेबराव पडोळे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांना समर्पित करतो. तसेच NIPER मोहाली मध्ये प्रवेश घेऊन फार्मास्युटिकल संशोधनाच्या क्षेत्रात मोठं योगदान देण्याचा माझा मानस आहे.- रितेश पडोळे