हिंगोली : शहरातील राज्य राखीव दल वसाहतीमध्ये घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोट्यांनी दोन घरे फोडून सुमारे २.२५ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. ठसे तज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळविले आहेत. त्यावरून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शहरातील खटकाळी रोड भागात राज्य राखीव दलाची वसाहत आहे. या ठिकाणी राखीव दलाच्या अधिकाऱ्यांची कार्यालयाचे आहेत. या शिवाय अधिकारी व जवानांची निवासस्थाने आहेत. राखीव दल वसाहतीमध्ये कोणालाही परवानगी शिवाय प्रवेश नसल्यामुळे ही वसाहत सर्वात सुरक्षीत वसाहत मानली जाते.
दरम्यान, या वसाहतीमध्ये राहणाऱ्या मनीषा मडके ह्या त्यांची आई आजारी असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे कुटुंब देखील विवाह सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दोन्ही घरांना कुलुप होते. या घरांना कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दोन्ही घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सामानाची नासधुस केली तसेच सामान अस्ताव्यस्त टाकून दिले.
त्यानंतर चोरट्यांनी दोन्ही घरातील कपाट फोडून त्यातील दागिने व रोख रक्कम असा २.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. दरम्यान, गुरुवारी मडके कुटुंबिय बाहेरगावावरून आल्यानंतर त्यांना घराचे कुलुप तुटल्याचे दिसून आले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने राखीव दलाच्या वरिष्ठांना तसेच शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगमनाथ परगेवार, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे यांच्या पथकाने भेट दिली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र श्वान पथक चोरट्यांचा माग काढू शकले नाही. ठसे तज्ञांनी घटनास्थळावरून चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळविले असून त्यावरून चोरट्यांचा शोध लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.