Hingoli Political News : सत्ता संघर्षात इतर पक्ष जोशात, काँग्रेस मात्र गोठलेल्या श्वासात File Photo
हिंगोली

Hingoli Political News : सत्ता संघर्षात इतर पक्ष जोशात, काँग्रेस मात्र गोठलेल्या श्वासात

हिंगोलीत काँग्रेस पक्ष अडचणीत, अस्तित्व टिकविण्याचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Political News Municipal, Zilla Parishad and Panchayat Samiti elections congress, bjp, shiv sena

गजानन लोंढे

हिंगोली : नगरपालिका, जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याने राजकीय पक्षातही धामधूम सुरू झाली आहे. सत्तेचा झेंडा फडकावण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तयारीचे रणशिंग फुंकले आहे. एकीकडे सत्ता संघर्षात महायुतीसह इतर सर्व पक्ष जोशात असताना, काँग्रेस मात्र गोठलेल्या श्वासात असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील राजकीय स्थिती पाहता एकेकाळी जिल्ह्यात आपली ठसठशीत ओळख निर्माण करणारा काँग्रेस पक्ष अडचणीत असून अस्तित्व टिकविण्याचे पक्षासमोर आव्हान आहे.

स्व. राजीव सातव असताना पक्षाने जिल्हयात सुवर्ण दिवस अनुभवले. परंतु, आता जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थितीकडे पाहिले तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पक्षात विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव वगळता एकही ठोस आणि जिल्हास्तरीय नेतृत्व उरलेले नाही.

एकेकाळी जिल्ह्यात पक्षाचे बळ वाढविणारे नेते सध्या पक्षापासून दूर गेले आहेत. काहींनी भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदे गटाचा आश्रय घेतला. उरले सुरले कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. सद्यस्थितीत जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ पक्षाचे काम पाहत आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आदी पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

फोडाफोडीचे राजकारण, उमेदवारांची तयारी, कार्यकर्त्यांच्या बैठकांवर भर दिला जात आहे. परंतु, काँग्रेस पक्षाकडे कुठलीही ठोस दिशा, नियोजन किंवा मोर्चेबांधणी दिसून येत नाही. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीसाठीसुद्धा कोणतीही हालचाल किंवा नियोजन होताना दिसन येत नाही. सध्या पक्षात कोणतेही नवे, उत्साही, जमिनीवर काम करणारे चेहरे नाहीत.

युवा नेतृत्वाच्या अभावामुळे आणि सत्तेपासून दूर असल्याने तरुण कार्यकर्तेही इतर पक्षांकडे वळत आहेत. दुसरीकडे जुने नेतेही सक्रियतेच्या बाहेर गेले आहेत. पक्षाचे कोणतेही ठळक सामाजिक कार्य, आंदोलन किंवा जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा ठोस कार्यक्रम गेल्या काही महिन्यांत राबविण्यात आला नसल्याने काँग्रेसमध्ये शिल्लक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मरगळ आल्याचे चित्र आहे.

आ. बांगरांकडून काँग्रेसला धक्का

नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी विधानसभा मतदार संघासह हिंगोली शहरातील दिग्गज कार्यकत्यांना शिंदे गटात खेचण्यास सुरुवात केली आहे. आमदार बांगर यांनी गुरुवारी काँग्रेसला मोठा धक्का देत कळमनुरी येथील माजी नगराध्यक्षा सुवर्णा गाभणे, प्रा. आनंद पारडकर, माजी नगरसेवक अरुण वाढवे, पंचायत समितीच्या माजी सभापती अनिता खुडे, माजी नगरसेवक देवराव बुरकुले यांच्यासह अनेकांना शिंदे गटात प्रवेश दिला आहे. शिंदे गट जिल्ह्यात वरचढ होत असताना काँग्रेसमध्ये मात्र शांतता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT