भीमराव बोखारे
वसमत : मोठ्या राजकीय घडामोडी, घराणेशाहीचा वाद आणि स्थानिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोपांनी गाजविलेल्या हिंगोली-परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार राजूभय्या नवघरे यांनी दणदणीत विजय संपादित करीत आपल्या विरोधकांना धोबीपछाड दिला. आमदार नवघरे हे दुसऱ्यांदा जिल्हा बँकेवर निवडून गेल्याने त्यांची सहकार क्षेत्रावरील पकड मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले.
सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत एकही निवडणूक न हरलेल्या आमदार राजूभय्या नवघरे यांना यंदाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती.
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा या दिग्गजांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी वगळता इतर सर्वच पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तुषार जाधव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार राजूभय्या नवघरे यांची जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिकार करण्याचा मनसुबा रचला होता. परंतु, राजकारणातील डावपेचात माहीर असलेल्या आमदार नवघरेंनी आपल्या सर्व विरोधकांचे डावपेच धुळीत मिळवत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादित केला.
आमदार नवघरे यांना ५८ तर तुषार जाधव यांना २० मते मिळाली. आमदार नवघरे यांचा तब्बल ३८ मतांनी विजय झाला. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच आमदार नवघरे यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष करीत गुलालाची उधळण केली.
आ. नवघरेंना रोखणे कठीण
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांच्या पाठिंब्यावर दिग्गजांना पराभूत करत विधीमंडळात प्रवेश करीत आमदार नवघरे यांनी आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवून दिली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत थेट आपले राजकीय गुरू असलेले माजी मंत्री दांडेगावकर यांना आस्मान दाखवत दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली.
बाजार समिती, नगर परिषद यासह इतर सर्वच निवडणुकांमध्ये आ. नवघरे यांच्या विजयाची घौडदौड सुरू असल्याने त्यांच्या विरोधकांकडून डावपेच आखले जात असताना देखील सर्व डावांवर मात करीत आमदार नवघरे यांची विजयी घौडदौड सुरू असल्याने त्यांच्या विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या जात आहे.