Hingoli News : भीषण अपघातात दोघे जागीच ठार file photo
हिंगोली

Hingoli News : भीषण अपघातात दोघे जागीच ठार

सेनगाव-रिसोड मार्गावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

Hingoli News: Two killed on the spot in a horrific accident

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा 1 ऑगस्ट रोजी रात्री 8 च्या सुमारास सेनगाव-रिसोड राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे पानकनेरगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सेनगाव-रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव मोटारसायकल जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकलस्वार सुजित कैलास बांगर (वय अंदाजे 26 वर्षे) व नितीन सुरेश बांगर (वय अंदाजे 25 वर्षे) या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सेनगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले. या प्रकरणाचा पुढील तपास सेनगाव पोलीस करीत आहेत. दरम्यान, सेनगाव रिसोड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण झाल्यानंतर या मार्गावरील वाहनांचा वेग आणि वाहतुकीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

भरधाव वाहने निष्काळजीपणे तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली. या मार्गावर वेग मर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, आवश्यक ठिकाणी इशारा फलक, रात्रीच्या वेळी परावर्तित (रिफ्लेक्टर) चिन्हे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सुजित कैलास बांगर आणि नितीन सुरेश बांगर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पानकनेरगाव गावावर शोककळा पसरली आहे. दोघेही तरुण, होतकरू आणि सर्वपरिचित असल्याने त्यांच्या निधनाने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT