Hingoli News: The number of students in the school is ten; in reality, there are only three students
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा सेनगाव तालुक्यातील अमरसिंग नाईक तांडा शाळेत १० पटसंख्या असतांना प्रत्यक्षात तीनच विद्यार्थी असून सदर विद्यार्थीही कधीच दिसले नाहीत, शाळेत चोविस तास तीनच दप्तर असतात तर शिक्षकही सतत गैरहजर असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून या शाळेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत गावकरी रामलाल मोहनलाल, महादू गोरे, उत्तम ठोके, शेख हकीम, बबन गोरे यांच्यासह इतर गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे निवेदन दिले आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता केंद्रा अंतर्गत अमरसिंग नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा कार्यरत आहे.
या शाळेत १० विद्यार्थी पटसंख्या आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थीच उपस्थित नसतात. शाळेत जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी मात्र एका बेंचवर तीन दप्तर ठेवलेले दिसत असून याच बेंचवर चोविस तास तेच दप्तर दिसून येते. या ठिकाणी असलेले शिक्षक सतत गैरहजर असून संबंधित शिक्षक त्यांच्या नातेवाईकाच्या नावे क्रीडा विभागाकडून विविध कामांचे कंत्राट घेत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
क्रीडा विभागाकडून घेण्यात आलेली कामे देखील निकृष्ठ दर्जाचीच केली जात असून शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीची दिशाभुल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शाळेत पटसंख्येवर असलेली बहुतांश विद्यार्थी खाजगी इंग्रजी शाळेत शिक्षण घेतात या ठिकाणी शिक्षकाचे पद टिकविण्यासाठी बनावट पटसंख्या दाखविण्यात आल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.
शाळा प्रशासनाच्या कामाची चौकशी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.