हिंगोली

Hingoli news | दोन दिवसांपासून रजिस्ट्री ठप्प; दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त

दोन दिवसांपासून नोंदणी व्यवहार ठप्प असतानाही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे

पुढारी वृत्तसेवा

औंढा नागनाथ : येथील दुय्यम निबंधक (नोंदणी) कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने मालमत्ता खरेदी-विक्रीच्या नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. विशेष म्हणजे, तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या या शासकीय कार्यालयात वीज खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून इन्व्हर्टर, जनरेटर किंवा अन्य कोणतीही बॅकअप यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मालमत्ता नोंदणीसाठी ग्रामीण भागासह विविध जिल्ह्यांतून नागरिक मोठ्या अपेक्षेने औंढा नागनाथ येथे येत आहेत. मात्र कार्यालयात वीज नसल्याच्या कारणावरून त्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून अखेरीस निराश होऊन परतावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

राज्य शासनाच्या महसूल व नोंदणी विभागाकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असताना प्रत्यक्षात महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात साधी वीज बॅकअप व्यवस्था नसणे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे, तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय या दोन्ही ठिकाणी पर्यायी वीज व्यवस्थेचा अभाव असल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

"दूरदूरून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असताना प्रशासन मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून नोंदणी व्यवहार ठप्प असतानाही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे," दरम्यान, नागरिकांच्या वाढत्या रोषामुळे संबंधित विभागाने तातडीने पर्यायी वीज व्यवस्था उपलब्ध करून नोंदणी प्रक्रिया सुरळीत करावी, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT