शेतकऱ्यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना दिलेले पत्र  Pudhari photo
हिंगोली

Hingoli News: आम्‍हाला विमानात बसवून विमानाचा अपघात करा, तेव्हा तरी वारसांना 1 कोटी द्याल; पूरग्रस्त शेतकऱ्यांचं सरकारला पत्र

उदरनिर्वाह कसा होणार या विवंचनेतील दौडगाव गावातील शेतकऱ्यांची शासनाकडे आर्त विनवणी

पुढारी वृत्तसेवा

औंढा नागनाथ : 'औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव परिसरातील 1600 एकर जमीन पाण्याखाली गेली असून अतोनात नुकसान झाले आहे या पोटी आम्हाला 50 हजार एकरी अनुदान द्या. नाही तर आम्हाला विमानात बसवून आमचा जीव घ्या व कुटुंबीयांना एक करोड रुपये देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी देशात झालेल्या दुर्देवी विमान अपघातातील मृत्‍यू पावलेल्या नागरिकांच्या वारसांना सरकारने एक कोटी रुपये मदत दिली होती. तसेच आमचाही अपघात करुन कुटुंबाना मदत करा, अशी मागणी केली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव हे सतत अतिवृष्टीने ग्रासलेले गाव असून या गावची लोकसंख्या 2000 पेक्षा अधिक आहे या गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे. मागील पाच वर्षापासून या गावांमध्ये सतत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यंदा झालेल्या पावसामध्ये सुमारे सोळाशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. संपूर्ण पिके यामध्ये सोयाबीन मूग उडीद कापूस हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे दौडगाव ता. औंढा ना. जि. हिंगोली येथे यावर्षी गावातील संपुर्ण 1600 एकर शिवारातील शेतकऱ्याचे शेतीचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेआहे. सदर नुकसानीमुळे सरासरी प्रत्येक शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख रुपये एकरी नुकसान झाले आहे. या शेतकरी वर्गांनी वेगवेगळ्या बँका, खाजगी पतसंस्था तसेच खाजगी सावकारांकडुन पेरणी व शेती मशागतीसाठी कर्ज घेतलेले आहे. सदर कर्जाची परतफेड व कुटुंबाचे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहीला आहे. सरकारने हेक्टरी ८५००/- मदत जाहीर केली आहे. जी अत्यंत अपुरी आहे. यामुळे गावातील कुठल्याही शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही. या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येकी कमीतकमी ५००००/- एकरी मदत मिळणे आवश्यक आहे. परंतु शासनातर्फे अशी मदत देण्याकरीता कुठलीही सकारात्मकता दिसून येत नाही.

मागील काही दिवसांपूर्वी देशात झालेल्या दुर्देवी विमान अपघातातील मृत्‍यू पावलेल्या नागरिकांच्या वारसास सरकारने एक कोटी रुपये मदत दिली होती. आता शेतकऱ्यांची संपूर्ण पिके वाहून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शासना तर्फे मिळणारी मदत अपुरी आहे. जर शासनाला एकरी पन्नास हजार रुपये मदत देणे शक्य नसेल तर गावातील नागरिकांना विमानात बसवुन सदर विमान दुर्घटनाग्रस्त करुन त्यात आमचा जीव घ्यावा व आमच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत. त्यामुळे आमच्या नंतर तरी आमचे कुटुंब सुखात जगतील अशी मागणी गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. सदर निवेदन ॲड. मुंजाभाऊ मगर, उद्धव मगर विठ्ठलराव रंगराव मगर विजयराव मगर सरपंच पार्वतीबाई मगर उपसरपंच संतोष कुठे ग्रामपंचायत सदस्य सखाराम बेकटे सोसायटीचे मा.चेअरमन बालासाहेब मगर सुधाकर सखाराम मगर पंडितराव कदम गुलाब उमराव मगर सूकेश शंकरराव मगर विनायक सखारामजी मगर अशोक बळीराम मगर अंगद प्रकाशराव मगर भारत मुरलीधर मगर बालासाहेब ग्यानबाराव मगर किसन अशोकराव मगर संतोष चोपडे विश्वनाथ चित्रे विठ्ठलराव आघाव माजी सरपंच लक्ष्मण विठ्ठलराव मगर गावातील सर्व नागरिकांनी दिले आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT