हट्टा : ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यातील धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला असून, गावकऱ्यांच्या नळातून येणाऱ्या पाण्यात अळ्या, शेवाळ तसेच घाण पाणी पुरवठा आढळून आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शेळके आणि संजय खाडे यांनी हा गंभीर प्रकार प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली.
पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयात अशी गंभीर हलगर्जी समोर आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नळाच्या पाण्यात अळ्या, शेवाळ आणि पाणी दूषित आढळणे म्हणजे पाणीपुरवठा व्यवस्थेतील स्वच्छतेकडे किती दुर्लक्ष झाले आहे, याचेच हे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा गावात सुरू आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाणीपुरवठ्यावर सरपंच व ग्रामसेवकाचे केवळ दुर्लक्ष आहे
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सरपंच दीपक हातागळे यांनी तत्काळ दखल घेत सर्व पाणी फिल्टरची साफसफाई करून घेतली. त्यामुळे ग्रामपंचायतीने उशिरा का होईना, पण या गंभीर प्रकाराची दखल घेतल्याचे दिसून आले. मात्र, इतका गंभीर प्रकार घडल्यानंतरच प्रशासन हालचालीला लागल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही ग्रामपंचायतीची मूलभूत जबाबदारी असून, यापुढे अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये यासाठी पाणी साठवण टाक्या, फिल्टर यंत्रणा आणि जलवाहिन्यांची नियमित तपासणी व स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे व पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्यांची साफसफाई करणे गरजेचे आहे गावातील पूर्ण नाल्या काढून साफसफाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.