Nagesh Ashtikar Party Change
गजानन लोंढे
हिंगोली :हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरे गटापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या भूमिकेवर ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून समाजमाध्यमांवरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघांसह नांदेड जिल्ह्यातील हदगाव व किनवट तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून शिंदे गटाचे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार मैदानात होते. या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांचा पराभव करत विजय मिळविला होता.
लोकसभा निवडणुकीनंतर खासदार आष्टीकर यांचा जिल्ह्याशी संपर्क अपेक्षेपेक्षा कमी झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. हिंगोली येथील कार्यालयाची जबाबदारी प्रामुख्याने स्थानिक कार्यकर्ते सांभाळत होते. दरम्यान, बुधवारी पक्षाच्या अन्य पाच खासदारांसह स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या पत्रावर त्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतचे संकेत स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून आपण पक्ष सोडणार नसल्याचे आष्टीकर यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
दरम्यान, ठाकरे गटाचे शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी आष्टीकर यांच्या निर्णयावर टीका करत, "पक्ष बदलण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा," अशी मागणी केली. तसेच इच्छेनुसार अन्य पक्षात प्रवेश करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले.
हिंगोलीच्या राजकीय इतिहासात पक्षांतराची काही उदाहरणे यापूर्वीही पाहायला मिळाली आहेत. माजी विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर विद्यमान राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या दोन्ही नेत्यांना नंतर पुन्हा महत्त्वाच्या राजकीय संधी मिळाल्या.
स्व. विलास गुंडेवार व विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपली टर्म पूर्ण होण्याअगोदरच शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. तर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी खासदार शिवाजी माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. तोच कित्ता माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी गिरविला. त्यांचा देखील 2014 च्या निवडणुकीत स्व. राजीव सातव यांनी पराभव केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी खासदार माने, वानखेडे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते पुन्हा कधीही निवडणुकीत जिंकले नाहीत. जो कोणी शिवसेनेला सोडून इतर पक्षात जातो त्याला हिंगोली लोकसभेची जनता पुन्हा स्वीकारत नाही हा इतिहास असल्याने खासदार आष्टीकर यांना 2029 च्या निवडणुकीत जनता स्वीकारेल काय, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.