ShivSena UBT : ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर

शिंदे गटात जाण्याची तयारी; माजी नगरसेवकाच्या फार्म हाऊसवर बैठक
ShivSena UBT
ShivSena UBT (शिवसेना ठाकरे गट )Pudhari News network
Published on
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचा ठाकरे गट पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. नाशिकरोड येथील एका माजी नगरसेवकाच्या फार्म हाऊसवर यासंदर्भात बैठक पार पडल्याची जोरदार चर्चा असून शिंदे गटात प्रवेशाची तयारी संबंधितांनी केल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाचा एक मोठा नेता या बैठकीत सामील होता, असे समजते.

लोकसभा निवडणुकीतील यशाने हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १४ जागांवर निवडणूक लढणाऱ्या महायुतीने सर्वच्या सर्व १४ जागांवर विजय मिळविला. मालेगाव मध्यची जागा एमआयएमने राखली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा जिल्ह्यात पुरता सुपडा साफ झाला. शहरी भाग असलेल्या नाशिक पश्चिम, नाशिक मध्य व देवळाली मतदारसंघात ठाकरे गटाला दारूण पराभव पत्करावा लागला. आता पराभवाची कारणमिमांसा सुरू झाल्यानंतर पराभवाचा ठपका अंगावर येऊ नये यासाठी ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकांनंतर होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकांमुळेही ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शहर व जिल्ह्याच्या राजकारणाच्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर महापालिका निवडणुकांमध्ये किमान नगरसेवक म्हणून निवडून येणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाकरे गटात बदलाचे वारे वाहू लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकरोडमधील ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाच्या फार्म हाऊसवर नुकतीच एक बैठक पार पडली. माजी नगरसेवकांसह ठाकरे गटाचा एक मोठा नेता या बैठकीला उपस्थित होता. राजकीय भवितव्य जपण्यासाठी शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

शिंदे गटाचे नेते अनभिज्ञ

शिंदे गटात प्रवेशासाठी ठाकरे गटात बैठका सूरू असताना शिंदे गटाचे नेते मात्र याविषयी अनभिज्ञ आहेत. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा ठपका लागू नये यासाठी संबंधितांनी पक्ष फुटीच्या चर्चा घडवून ठाकरे गटात स्वत:चे खुंटे बळकट करून घेण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केल्याची कुजबुज सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news