Marigold Farmers Losses pudhari photo
हिंगोली

Marigold Farmers Losses : झेंडू उत्पादकांना दुष्काळात तेरावा महिना

फुले रस्त्यावर फेकण्याची आली वेळ, उत्‍पादन खर्चही निघाला नाही

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : दसरा व दिवाळीचा मुहूर्त साधून शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली होती. दुष्काळी परिस्थितीतही झेंडूच्या फुलाला जगवून दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्रीसाठी आणलेल्या झेंडूच्या फुलांना मंगळवारी मातीमोल दर मिळाला. अक्षरशः पाच ते सहा रुपये प्रतिकिलो दराने फुलांची विक्री करावी लागली. सायंकाळी तर बहुतांश झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीअभावी शिल्लक राहिलेली फुले रस्त्यावर फेकुन दिली. झेंडू उत्पादकांना यंदाचा दुष्काळ तेरावा महिना ठरला.

यंदा अल निनोमुळे जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया पहावयास मिळाली. जुलै महिन्यानंतर पाऊस पडलाच नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जेमतेम पाऊस पडला. त्यानंतर पावसाने निरोप घेतला. परिणामी, खरीप हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला. जिल्ह्यात झेंडू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. दसरा व दिवाळीला झेंडू फुलांची विक्री करून चार पैसे पदरात कसे पडतील याकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल असतो. यंदा मात्र दुष्काळी परिस्थिती असूनही झेंडू उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली.

दोन दिवसांपासूनच शेतशिवारात झेंडूची तोडणी करून ती फुले नांदेड, हैदराबाद, नागपूर याठिकाणी विक्रीसाठी पाठविण्यात आली तर छोट्या शेतकऱ्यांनी मात्र स्थानिक बाजारपेठेतच आपली फुले विकून चार पैसे मिळतील असे नियोजन केले. परंतू, बाजारात मंगळवारी मोठया प्रमाणात झेंडूंच्या फुलांची आवक झाली. सकाळी १० रूपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या झेंडूंची फुले दुपारी २ नंतर मात्र चक्क चार ते पाच रूपये प्रतिकिलो दराने विकावी लागली.

सायंकाळी तर दहा रूपयात चार ते पाच किलो फुले शेतकऱ्यांकडून दिली जात होती. सायंकाळी ७ नंतर बहुतांश शेतकऱ्यांनी शिल्लक राहिलेली फुले जागेवरच ठेवून गावाचा रस्ता धरला. काही शेतकऱ्यांचा तर लागवड खर्चही निघाला नाही.

झेंडूसाठी प्रतिएकर ४० ते ५० हजार रूपयांचा खर्च आला. उत्पन्न मात्र १५ ते २० हजार रूपये मिळाले. परिणामी झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना कष्ट वगळता थेट २५ ते ३० हजार रूपयांचा फटका बसल्याने यंदा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत आल्याचे चित्र दिसून आले.

अख्या बाजारात फुलेच फुले

येथील गांधी चौक परिसरात शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून फुलांची विक्री सुरू केली. मुख्य बाजारपेठेसह शहरातील चौकाचौकात ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांकडून फुले विक्रीची दुकाने थाटली होती. नर्सी फाटा, नांदेड नाका, बळसोंड बायपास, खटकाळी बायपास परिसरातही मोठया प्रमाणात फुले विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. शहरात अनेक ठिकाणी पिवळे व नारंगी झेंडूंची फुले विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने संपूर्ण बाजारपेठ पिवळीधमक दिसून येत होती.

  • मी माझ्या शेतात दहा गुंठे कलकत्ता झेंडूची लागवड केली होती. यासाठी मला १५ हजार रुपये खर्च आला. सकाळपासून २ क्विंटल फुलांची विक्री झाली. हातावर १८०० रुपये आले. फुले आणण्यासाठी ७०० रुपये गाडीचे भाडे लागले. फुलांच्या विक्रीतून हातावर केवळ ११०० रुपये मिळाले असे लाख येथील झेंडू उत्पादक शेतकरी पांडुरंग कदम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT