Lakh villagers support Maratha Morcha
हिंगोली : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी 29 ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत महामोर्चा निघणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील ग्रामस्थांची गुरूवारी रात्री महादेव मंदिरात बैठक पार पडली. मुंबईसाठी गावातील शेकडो तरूण जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईला जाणार्या युवकांसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी देण्याचा निर्णय घेत सोबत राशन पाणीही नेले जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या 27 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न केल्यास 29 ऑगस्ट रोजी महामोर्चा मुंबईत नेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासाठी त्यांनी मागील काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला आहे. हिंगोलीत 16 ऑगस्ट रोजी जरांगे यांची बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
गावोगावी मुंबईच्या मोर्चाला जाण्याची तयारी केली जात आहे. बैठका घेत नियोजन देखील केले जात आहे. गुरूवारी रात्री 8 च्या सुमारास लाख येथील महादेव मंदिरात गावातील तरूणांनी एकत्र येऊन मुुंबईला जाण्यासाठी बैठकीत नियोजन केले. शेकडो युवक मुंबईला जाण्यासाठी तयार झाले आहेत. ज्यांना मुंबईला जाणे शक्य नाही त्या समाज बांधवांकडून लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी संकलित केला जाणार आहे. ग्रामस्थ भरभरून सहकार्य करीत आहेत. मुंबईला रवाना होताना वाहनामध्ये राशन देखील सोबत नेले जाणार आहे. स्वतः स्वयंपाक करून मोर्चात सहभागी युवकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. एकूणच लाख येथील मराठा युवकांनी मुंबईच्या महामोर्चासाठी वज्रमुठ आवळली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर 2023 रोजी डिग्रस कर्हाळे पाटी येथे मराठवाड्यातील सर्वात मोठी सभा झाली होती. या सभेत सहभागी समाज बांधवांसाठी लाख येथील ग्रामस्थांनी तब्बल 32 क्विंटल पुर्या व मिरच्यांचा ठेचा तयार करून समाज बांधवांना वाटप केला होता. 32 क्विंटलच्या पुर्यांमुळे लाख गाव संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते. आता पुन्हा लाख येथील युवक मुंबईला धडकणार असल्याने लाख येथील नियोजनाची चर्चा सुरू झाली आहे.