हिंगोली ः माळसेलू येथील महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयावर हंडामोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली.  pudhari photo
हिंगोली

Hingoli Women protest : पाण्यासाठी माळसेलू येथील महिला आक्रमक

जिल्हा परिषदेवर काढला हंडा मोर्चा, कोट्यवधी रुपये खर्चूनही पाणी मिळेना

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : तालुक्यातील माळसेलू येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल 1.33 कोटी रुपयांचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महिलांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला. यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तालुक्यातील माळसेलू येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आले आहे. याकामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजूरी देऊन कामांना सुरवात करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात काम सुरू असताना एकही अधिकारी कामांची पाहणी करण्यासाठी आला नाही. त्यामुळे कंत्राटदाराने अंदाजपत्रकानुसार नळ पाणी पुरवठा योजनेचे कामच केले नाही.

गावात जलवाहिन्या अत्यंत कमी खोलीवर अंथरण्यात आल्या आहेत. शिवाय पाण्याची चाचणीही घेण्यात आली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. दरम्यान, या कामांवर सध्याच्या स्थितीत 1.33 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. सध्या वाढत्या उन्हात गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होत असून कोट्यवधी रुपयांच्या निधीचा काहीही उपयोग झाला नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

माळसेलू गावात पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी गावातील महिलांनी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला. या संदर्भात अनिल नायक, मनोहर वामन, देवानंद भिसे, भिमराव भिसे, संतोष भिसे, जगन वामन, राहुल भिसे, अशोक भिसे, तुकाराम वामन यांच्यासह गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे निवेदन सादर केले.

प्रशासनाने पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालून गावात तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT