Maharaj Bhajiyewale Hotel License Cancelled
हिंगोली : शहरातील जुन्या जिल्हा परिषद इमारतीसमोर असलेल्या आणि मुगाच्या भज्यांसह खिचडीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘महाराज भजीयेवाले’ हॉटेलचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने तातडीने रद्द केला आहे. हॉटेलमधील अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत झालेल्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी अचानक तपासणी केली. त्यानंतर बुधवारी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर हॉटेल पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
‘महाराज भजीयेवाले’ हे हॉटेल हिंगोली शहरात खिचडी आणि मुगाच्या भज्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. शहरासह ग्रामीण भागातून येणारे नागरिक मोठ्या संख्येने येथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. दररोज शेकडो ग्राहकांची वर्दळ असलेल्या या हॉटेलच्या स्वच्छतेबाबत मात्र आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, भाजपच्या पदाधिकारी प्रीती जैस्वाल यांनी या हॉटेलमधून खिचडी मागवली होती. त्यामध्ये दोन आळ्या आढळून आल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकाराचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला. खाद्यपदार्थांमध्ये कीड आढळल्याने त्यांनी संताप व्यक्त करत याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी हॉटेलची अचानक तपासणी केली. सहाय्यक आयुक्त पवन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी राजश्री सावंत आणि लोंढे यांच्या पथकाने हॉटेलमधील स्वच्छता, खाद्यपदार्थांची हाताळणी तसेच अन्नसुरक्षेशी संबंधित बाबींची पाहणी केली.
तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हॉटेल बंद करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरातील इतर हॉटेल व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे.
हिंगोली शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना रद्द करण्याची ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी शहरातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची पाहणी केवळ औपचारिक स्वरूपात होत असल्याची चर्चा होती. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात होते.
मात्र, ‘महाराज भजीयेवाले’ हॉटेलवरील कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून गेला आहे. दरम्यान, शहरातील इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही नियमित तपासणी करून अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.