Kalmanuri Farmers Protest Shaktipeeth Highway Pudhari
हिंगोली

Shaktipeeth Highway Protest | बऊर येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध

आमदार संतोष बांगरांची शेतकऱ्यांसाठी हजेरी

पुढारी वृत्तसेवा

Kalmanuri Farmers Protest Shaktipeeth Highway

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील बऊर येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी करण्यासाठी आलेल्या महसूल व मोजणी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केल्याने अधिकाऱ्यांना मोजणीचे काम अर्धवट सोडून साहित्य घेऊन परतावे लागले. यावेळी कांडली, देवजना तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी घटनास्थळी एकत्र आले होते.

शक्तीपीठ महामार्गासाठी बऊर परिसरात मोजणी सुरू होणार असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकत्रितपणे त्यांनी मोजणीला तीव्र विरोध दर्शवत ‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा’, ‘शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवा’, अशा घोषणा दिल्या.

महसूल व मोजणी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोजणीचे साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता मोजणी करणे शक्य झाले नाही. अखेर अधिकाऱ्यांना मोजणी न करताच माघारी परतावे लागले.

आमदार संतोष बांगरांचा शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा

दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली. शेतजमीन ही शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असून, महामार्गासाठी जमिनी गेल्यास त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“या परिसरातून शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहेत. जमिनी गेल्यानंतर शेतकऱ्यांनी जगायचे कसे?” असा सवाल आमदार बांगर यांनी मोजणी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला.

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करत परिसरातील शेतकरी यापूर्वीपासूनच विरोध करत आहेत. बऊर येथील मोजणीला झालेला विरोध हा या आंदोलनाला आणखी धार देणारा ठरला आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT