Hingoli Kalamnuri Bus Hits Bike Pudhari
हिंगोली

Hingoli Accident | भरधाव एसटी बसची दुचाकीला पाठीमागून धडक; दोघांना २० मीटर फरफटत नेल्याने गंभीर दुखापत

भाटेगाव येथील भीषण अपघात; ग्रामस्थांच्या तत्परतेने जखमींना मिळाली मदत

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Kalamnuri Bus Hits Bike

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे शुक्रवारी (दि. ३) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास भरधाव एसटी बसने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. धडकेनंतर दोघेही बसखाली अडकून सुमारे २० मीटरपर्यंत फरफटत गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडहून हिंगोलीमार्गे अमरावतीकडे जाणारी मुखेड–अमरावती मार्गावरील एसटी बस (क्र. एमएच-२० बीएल-४०१३) भाटेगाव येथे आली असता, समोरून जात असलेल्या मोटारसायकलला (क्र. एमएच-३८ क्यू-५६८९) पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे मोटारसायकलवरील दोघे रस्त्यावर फेकले गेले आणि बसखाली अडकले. बस त्यांना जवळपास २० मीटरपर्यंत फरफटत नेत रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली.

या भीषण अपघातात दयावंत बळीराम राठोड (वय ३५, रा. भाटेगाव, ता. कळमनुरी) आणि रमेश राठोड (वय ५०) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बसखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच डोंगरकडा बीटचे जमादार संतोष नागरगोजे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. बचावकार्यात गावातील नागरिक, पत्रकार आणि युवकांनीही मोलाचे सहकार्य केले.

या अपघातामुळे काही काळ भाटेगाव परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. एसटी चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT