रावसाहेब बापुराव मगर Pudhari
हिंगोली

Shaktipeeth Highway Farmer Death| 'शक्तिपीठ'चा पहिला बळी: महामार्गबाधित शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले

कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील जांब शिवारात घटना

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Shaktipeeth Highway Affected Farmer Death

सिंदगी : सततची नापिकी, वाढता कर्जबोजा आणि आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकरी रावसाहेब बापुराव मगर (वय 51) यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील जांब शिवारात घडली.

रावसाहेब मगर हे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एक असल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

रावसाहेब मगर यांच्या नावे मौजे जांब शिवारातील गट क्रमांक 22 मधील शेती प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांनी सन 2019 मध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, हिंगोली शाखेतून 75 हजारांचे पीककर्ज घेतले होते. मात्र, सलग नापिकी आणि अपुऱ्या उत्पन्नामुळे कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. त्यामुळे ते दीर्घकाळ आर्थिक आणि मानसिक तणावाखाली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन विवाहित मुली आहेत. 24 जून रोजी मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवर फोन करून विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृताच्या भावाने दिलेल्या जबाबात सततची नापिकी आणि पीककर्जाच्या विवंचनेमुळे ते मानसिक तणावात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला परिसरातील शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. हा महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी शेतकरी सातत्याने आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने शेतकरी वर्गातील अस्वस्थता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि प्रस्तावित मार्ग रद्द करावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT