Gold Theft Hingoli
सिंदगी : पोलीस असल्याची बतावणी करून दोन अज्ञातांनी वृद्ध शेतकऱ्याची सोन्याची अंगठी हातचलाखीने लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी सिंदगी गावाजवळ घडली. याप्रकरणी किशनराव नामदेवराव मगर (वय 65, रा. सिंदगी ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, मगर हे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गावातील एका पिठाच्या गिरणीवरून दळण आणण्यासाठी गेले होते. गिरणीवरून परत येत असताना सकाळी सुमारे 10.15 वाजता सिंदगी गाव ते सिंदगी आबादी रोडवरील लिंबाच्या झाडाखाली त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी “आम्ही पोलीस आहोत” अशी बतावणी करून परिसरात चोरीच्या घटना घडत असल्याचे सांगत त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून ठेवण्यास सांगितले.
त्यावेळी आरोपींपैकी एकाने पोलिस ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर मगर यांनी त्यांच्या हातातील सुमारे सहा ग्रॅम वजनाची व अंदाजे 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी काढून दिली. आरोपींनी ती अंगठी कागदात गुंडाळून रुमालात बांधून दिली व तेथून पसार झाले.
थोड्याच वेळात रुमाल उघडून पाहिले असता त्यामध्ये खरी सोन्याची अंगठी नसून बनावट अंगठी आढळून आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मुलाला घटनेची माहिती दिली. मुलाने आरोपींचा पाठलाग केला असता ते बोल्डा च्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी अज्ञात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.