Hingoli Illegal sale of alcohol Police Superintendent warns of crackdown
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागांमधून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांना पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून चांगलीच तंबी दिली. यापुढे दारू विक्री करताना आढळल्यास तडीपारची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात मागील काही दिवसांपासून बेकायदेशीर दारू विक्रीचे प्रमाण वाढले होते. याशिवाय ग्रामीण भागामध्ये गावठी दारूचे गाळप करून त्याची विक्री केली जात होती. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देऊन गावात बेकायदेशीर होणारी दारू विक्री तातडीने बंद करावी अशी मागणी केली होती.
त्यावरून पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर छापे टाकण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली. या पथकाने मागील एक महिन्यात तब्बल आठ लाखांपेक्षा अधिक रकमेची दारू व दारू गळापासाठी लागणारे रसायन जप्त केले.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर दारू विक्रीचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेल्या दारू विक्रेत्यांना तातडीने हजर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ठाणेदारांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील तेरा पोलिस ठाण्यांनी सुमारे २५ पेक्षा अधिक दारू विक्रेत्यांना बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर केले.
यावेळी पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी दारू विक्रेत्यांना तंबी दिली. यापुढे दारू विक्री केल्याचे आढळून आल्यास तडीपारीची कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांनीही दारू विक्री करणाऱ्यांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.